Sugriva He Sahas Asale

भूपतीस तुज मुळिं न शोभलें

अटीतटीचा अवघड हा क्षण
मायावी तो कपटी रावण
भिडलासी त्या अवचित जाउन
काय घडें तें नाहीं कळलें

विचारल्याविण मला, विभिषणा
सांगितल्याविण नला, लक्ष्मणा
कुणा न देतां पुसट कल्पना
उड्डणा तव धाडस धजलें

ज्ञात मला तव अपार शक्ति
माझ्यावरची अलोट भक्ति
तरीहि नव्हतें योग्य संप्रति
अनपेक्षित हें काही घडले

द्वंद्वे जर तुज वधणें रावण
वृथा जमविलीं सैन्यें आपण
कशास यूथप वा वानरगण
व्यर्थच का हे ऋक्ष मिळविले?

काय सांगुं तुज, शत्रुदमना
नृप नोळखती रणीं भावना
नंतर विक्रम, प्रथम योजना
अविचारें जय कुणा लाभले?

तू पौलस्त्यासवें झुंजता
क्षीण क्षण जर एकच येता
सन्मित्राते राघव मुकता
तव सैनिक मग असते खचले

काय लाभतें या द्वंद्वानें?
फुगता रावण लव विजयानें
लढते राक्षस उन्मादानें
वानर असते परतच फिरले

दशकंठचि मग विजयी होता
मैथिलीस मग कुठुन मुक्तता?
व्यर्थच ठरतीं वचनें शपथा
कुणी राक्षसां असतें वधिलें?

जा सत्वर जा, जमवी सेना
करी रणज्ञा, सुयोग्य रचना
आप्त-सैन्यासह वधूं रावणा
व्यर्थ न दवडी शौर्य आपुलें



Credits
Writer(s): G D Madgulkar, Sudhir V Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link