Lavite Mee Niranjana

लाविते मी निरांजन तुळशीच्या पायापाशी
भाग्य घेऊनिया आली आज धनत्रयोदशी

आली दिवाळी, दिवाळी पहाटेच्या त्या आंघोळी
घरोघरी जागविते माय मुले झोपलेली
घरोघरी दीपज्योती वर्षाचा मोठा सण
क्षणो-क्षणी होते आई आज तुझी आठवण

चार वर्षामागे होता हात तुझा अंगावरी
कधी नाही जाणवली हिवाळ्याची शिरशिरी

आज झोंबतो अंगाला पहाटेचा थंड वारा
कुठे मिळेल का आई तुझ्या मायेचा उबारा?

तुझ्याविना आई घर सुने-सुनेसे वाटते
आणि दिवाळीच्या दिशी तुझी आठवण येते
लाविते मी निरांजन...

सासरीच्या या संसारी, माहेराची आठवण
आठवती बाबा, भाऊ आणि दारीचं अंगण

अंगणात पारिजात कोण देई त्याला पाणी?
दारी घालिते रांगोळी माझ्यावाचून का कोणी?
लाविते मी निरांजन...

आई तुझ्या पायापाशी घोटाळते माझे मन
जिथे उभे अंगणात तुळशीचे वृंदावन

दारापुढे लिंबावर साद घालतो कावळा
कोण येणार पाहुणा? आतुरला जीव भोळा
लाविते मी निरांजन...



Credits
Writer(s): Bal Kolhatkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link