Chala Mulano

या, वाऱ्याच्या बसुनी विमानी
सहल करुया गगनाची
चला मुलांनो, आज पाहूया
शाळा चांदोबा गुरुजींची

चला मुलांनो, आज पाहूया
शाळा चांदोबा गुरुजींची

आज पौर्णिमा जमले तारे
आकाशाच्या वर्गात
चांदोबा गुरुजी तर दिसती
आपुल्या मोठ्या मोदात

हसुनी चांदण्या करीती किलबिल
आपुल्या इवल्या डोळ्यांची
चला मुलांनो, आज पाहूया
शाळा चांदोबा गुरुजींची

द्वितीयेपासून रोजच येती
गुरुजी उशीरा शाळेत
मुले चांदणी फुलती आणिक
सगळी आपुल्या गमतीत

कधी वर्गातून पळते उल्का
ओढ लागुनी पृथ्वीची
चला मुलांनो, आज पाहूया
शाळा चांदोबा गुरुजींची

कुणी तेजाचे ओठ हलवूनी
मंगळास वेडावित असे
रागाने मग मंगळ वेडा
गोरा-मोरा होत असे

बघुनी सारे हसता-हसता
उडते चंगळ ताऱ्यांची
चला मुलांनो, आज पाहूया
शाळा चांदोबा गुरुजींची

कधी वेळेवर, केव्हा उशीरा
अवसेला तर पूर्ण रजा
राग कधी ना या गुरुजींना
कधी कुणा करीती ना सजा

असे मिळाया गुरुजी आम्हा
करू प्रार्थना देवाची
चला मुलांनो, आज पाहूया
शाळा चांदोबा गुरुजींची

या वाऱ्याच्या बसुनी विमानी
सहल करुया गगनाची
चला मुलांनो, आज पाहूया
शाळा चांदोबा गुरुजींची

चला मुलांनो, आज पाहूया
शाळा चांदोबा गुरुजींची



Credits
Writer(s): Shantaram Nadgaonkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link